८एप्रिल २०१६ गुढी पाडवा ! नवं वर्षाची सुरवात ! दुबईच्या वाळवंटातील अंगाला बोचणारी सुखद थंडी ,उभारलेल्या
उत्तुंग गुढ्या ,रांगोळ्या ,आंब्याच्या पानांच्या, झेंडूच्या फुलांच्या माळा, सर्वत्र मंगलमय वातावरण आणि दुबईतील
“Gallop Events आणि Peshava Restaurant “ यांनी आयोजित केलेला,सुधिर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन
केलेला, राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या गायनाचा ‘ उत्तुंग ‘ सोहोळा !
अशा या उत्तुंग सोहोळ्यात राहुल आणि महेश यांच्या सुरेल स्वरांनी घेतलेली उत्तुंग भरारी स्वर्गापर्यंत पोहोचली
आणि जणू गांधर्व सभा वाळवंटात अवतरली.पूर्वी तानसेनच्या स्वरांनी पावसाला पृथ्वीवर आणले,पण आधुनिक
काळातील या तानसेनानी प्रत्यक्ष स्वर्गच वाळवंटात आणला आणि आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वर्गीय स्वरांच्या
मैफिलीने रसिकांची मने जिंकली. दीर्घकाळ पर्यंत वाजणाऱ्या टाळ्यांच्या गजराने इंद्रदेवाच्या दरबारात वाजणाऱ्या
नगाऱ्यानाही लाजवले आणि उस्फूर्तपणे उभे राहून रसिक प्रेक्षकांनी जी दाद दिली त्यामुळे राहुल महेश भारावले !
राहुल तर कार्यक्रम संपल्यावर लागलीच ,भारतात परतण्यासाठी airport वर गेला.
रसिकांच्या गर्दीतून थोडासा मोकळा झालेला दिसताच मी महेशला विचारले ‘ महेश मला उद्या मुलाखतीसाठी
थोडासा वेळ देऊ शकशील का ? खर म्हटलं तर माझे मन थोडेसे साशंक होते ,कारण तो त्याच दिवशी पहाटे ४
वाजता दुबईत आला होता,संध्याकाळी मैफिल करून,दुसऱ्या दिवशी सकाळी १२ वाजताच त्याचे मुंबईचे flight
होते. पण कोणतेही आढेवेढे न घेता तो पटकन म्हणाला,हो येईन की सकाळी ८ वाजता breakfast ला येतो.
त्याच्या होकाराने आम्हाला आनंद झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता तो घरी आला.
“ महेश काळे “– -साधा सरळ विनम्र ,भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवाह जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरविण्याची
जिद्द बाळगणारा ,या कार्यासाठी तरुणाईच्या मनाचा थांग गाठून त्यांच्या मनात शास्त्रीय संगीताची आवड
निर्माण करणारा असा एक तरुण ! गायन हा त्याचा आत्मा आहे, शास्त्रीय संगीत हा त्याचा गाभा आहे.तत्त्वज्ञान हे
त्याच्या विचारांची बैठक आहे .गाण्यावर तो भक्ती करतो आणि म्हणुनच तो नतमस्तक होतो .भारतीय
संस्कृतीची,आपल्या मराठी परंपरेची पाळेमुळे त्याला जगभर पसरवायची आहेत आणि म्हणून शास्त्रीय संगीता
बरोबर तो अभंग गातो कीर्तन करतो. व्यवसायाने इंजिनिअर असलेला,पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत
गेलेला हा तरुण तिथे जाऊन सानफ्रान्सिस्को इथे राहून,शास्त्रीय संगीत हाच आपला पेशा स्वीकारून २५०/ ३००
मुलांना भारतीय संगीताचे धडे देतो,संगीताचे विविध उपक्रम करतो.
घरात पाऊल टाकल्या टाकल्याच अतिशय मनमोकळेपणाने त्याने बोलायला सुरवात केली आणि असं वाटलं की
पूर्व परिचित कोणीतरी बरेच दिवसांनी भेटत आहे ! परकेपणाचे बंध तर कधीच गळून पडले होते त्यामुळे मी त्याला
म्हटले ,महेश मी जरा रेकॉर्डींग करते आहे, मला जरा मधून मधून बघावे लागेल. कारण मला या technology ची
सवय नाही. त्यावर तो पटकन म्हणाला काकू उलट तुम्ही technology वापरता हे फार चांगले करत आहात. मला
गाण्याच्या निमित्ताने non music forum मध्ये बोलायची संधी मिळते. तिथे usa मध्ये Common Wealth
Club आणि IIT च्या मुलांचे PANIIT convention होते. तिथे बोलताना मी सांगितले आज मेडिसिन इतके प्रगत
झाले आहे की काही incurebal आजार सोडले तर बहुतेक सर्व आजारांवर उपचार होऊ शकतो.त्यामुळे आज
आयुष्यमान वाढले आहे.आणि म्हणुन now, age will be define by how current you are, in the sense
of being able to access technology,being able to communicate the people at large,being able to
travel and being able to control your life as a social human being.There is no age barrier. When
you stop to use the current technology,you will become old !
महेशचे हे विचार ऐकले आणि नवीन पिढीचे विचार किती प्रगल्भ होत आहेत याची जाणीव झाली आणि लक्षात
आले की ह्या मुलाच्या विचारांची चमक काही वेगळीच आहे.मी त्याला म्हटले आत्ता पर्यंतच्या तुझ्या आयुष्याच्या
प्रवासात वेवेगळ्या टप्प्यांवर कोणते “ turning points “ आले होते की ज्यामुळे तुझ्या आयुष्याला वेगळे वळण
लागले किंवा तुझ्या विचारांची दिशा बदलली हे सांगशील का ?
महेश सांगू लागला. मी पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेला मुलगा. तसे गाणे आमच्या घरातच
! माझ्या बाबांना गाण्याची जाण खूप. त्यांना सारेगम माहीत नसले तरी सर्व राग माहीत आहेत. बाबा ३० सेकंदात
राग ओळखतात.त्यांचा आवाज चांगला आहे पण मध्यमवर्गीय परिस्थिती,घराच्या अनेक जबाबदाऱ्या यामुळे ते
पुढे गाणे शिकू शकले नाहीत.
माझी आई मीनल काळे.आई गाणे शिकली ते वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडून.तिने गाण्यात MA केले .आमच्याकडे
घरात कोणताही कार्यक्रम असो लग्न मुंज गणपती कोजागिरी,त्याची सांगता गाण्यात व्हायची. माझा दादा उत्तम
तबला वाजवतो.माझी बायको पूर्वा ही १५ वर्षे गाणे शिकली आहे आणि तिने पण usa मध्ये मास्टर्स केले Digital
Media Engineering मध्ये .मामा मामी उत्तम गातात.त्यामुळे गाणे हा आमच्या घराण्याचा एक अविभाज्य भाग
आहे.माझी आई ही माझी पहिली गुरु.तिने मला संगीत कलेची प्रथम ओळख करून दिली .वयाच्या सहाव्या
वर्षापासून मी गाणे शिकायला लागलो. लहानपणापासून आई मला गाण्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला
सांगायची.त्यामुळे साहजिकच माझ्यात सभाधीटपणा आला जो जीवनाच्या पुढच्या प्रवासात फार उपयोगी पडत
आहे.शास्त्रीय संगीताचे धडे मी पुरुषोत्तम गांगुर्डे (जे पंडित यशवंतबुवा गुरु यांचे शिष्य होते )यांच्याकडूनही घेतले.
याच सुमारास सामाजिक जीवनात एक मोठे स्थित्यंतर झाले.ते म्हणजे केबलचा आपल्या जीवनात प्रवेश झाला!
आत्ता पर्यंत tv होते पण केबल नव्हती,त्यामुळे सर्वांच्याच जीवनात आमुलाग्र बदल झाला.माझ्या दृष्टीने तो एक
turning point ठरला ! त्यानंतर पटापट अनेक वाहिन्या आल्या. mtv,vtv ,अल्फा चे ztv झाले. star sony आले
आणि त्यामुळे एका वेगळ्या स्तरावरची वाट सर्वाना सापडली,नवीन दालने उघडली. मला Bryan Adam ,Michel
Jackson,Mariah Carey ,Whitney Houstan हे सर्वजण भयंकर आवडायचे . माझ्या libraryत त्यावेळी
शास्त्रीय संगीतापेक्षा इंग्रजी गाण्यांचा संच अधिक होता.
माझ्या जीवनातील सर्वात मोठा turning point ,सर्वात मोठे स्थित्यंतर झाले मी १०वीत होतो तेव्हा ! ह्या
आमुलाग्र बदलाने माझ्या जीवनाला नवीन वळण लावले,आयुष्याला अर्थ दिला. त्यावेळी गाणे शिकण्यासाठी मला
पद्मश्री पंडित जीतेन्द्रबुवा अभिषेकींकडे नेले.तिथे त्यावेळी सर्व जीवनपद्धतीच वेगळी होती. त्यांनी मला
सांगितले की या उद्या पहाटे ४ वाजता !दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता मी त्यांच्याकडे हजर झालो. ते म्हणाले
तंबोरा घ्या आणि षड्ज गा वरती जाऊन. मी वरती गेलो आणि षड्ज गात बसलो एकटाच दोनतीन तास.असे ६
महिने गेले ,मला समजत नव्हते की मी माझ्या परीने सर्व मेहनत करत आहे पण तरीही हे मला शिकवत का
नाहीत? त्यावेळी information आणि insight मध्ये फरक होता. त्याकाळात गुरु शिष्यापासून मुद्दाम हातचे
राखून ठेवत असे,ते त्याला द्यायचे नाही म्हणून देत नसत असे नव्हते तर ते परीक्षा घेत असत.एक दिवस माझा
हात मोडला. तरीही मी तसाच त्यांच्याकडे गेलो. माझ्या सुदैवाने दार उघडायला तेच आले आणि आश्चर्यचकित
होऊन त्यांनी विचारले काय रे काय झाले ? मी म्हटले हात मोडला .ते लागलीच म्हणाले अरे पण मग कशाला
आलास तू ? त्यांनी माझी परीक्षा घेतली होती. जेव्हा तुम्हाला मनापासुन काहीतरी हवे असते,तेव्हा ते
मिळविण्यासाठी तुम्ही काहीही करता,कितीही कष्ट करायची तुमची तयारी असते. गाण्याविषयी मला असलेली
आस्था,कळकळ त्यांच्या लक्षात आली.मला वाटते त्यावेळी गुरूंची भावना अशी असायची का की दान करावयाचे ते
सत्पात्री करावयाचे ? त्यांच्या कसोटीला मी उतरलो होतो.आणि अखेर गुरुशिष्याची जोडी जमली !अशा पद्धतीने
एका व्यासंगी गुरुजींकडे माझे गाणे शिकणे सुरु झाले.
आपल्या ऋषीतुल्य गुरुजींविषयी महेश अगदी तल्लीन होऊन सांगत होता. त्याला मधेच थांबवत मी म्हटले
अशाप्रकारे अभिषेकीजींच्या रत्नपारखी नजरेने खरा हीरा अचूक हेरला आणि त्याला पैलू पाडायला सुरवात केली
स्मितहास्य करत महेश पुढे बोलू लागला — — ‘गुरुकुल ‘ ही पद्धती आत्ताच्या शिक्षण पद्धतीपेक्षा अधिक
अद्ययावत परिपूर्ण होती,म्हणूनच आज हजारो वर्षे ती टिकून राहिली.कारण ही एक ‘मुखोद्गत ‘ कला आहे.
इतकी वर्षे ती गुरुमुखातून शिष्याकडे जात आहे — -it goes from oral tradition !
भारतीय संगीताचा ढाचा मजबूत करायचे काम शास्त्रीय संगीत करते.भारतीय संगीताची जी priliminary
notesion system आहे तिच्यात आजही काहीही आकार ऊकार दिसत नाहीत,कला दिसत नाही. कमान आहे की
नाही हे पण नंतर कळते.ढाच्यामध्ये फक्त सांगाडा दिसतो. लोड बेअरिंग असते त्याप्रमाणे. तेव्हढंच फक्त
पुस्तकात आहे ,तेव्हढंच अजूनही दिसते. त्यात शब्द भरून सजावट करण्याचे काम गायकाने करायचे असते. या
ढाच्यात विविध गायक आपले रंग भरून भिन्न सजावटीचे गाणे सादर करतात.गाण्यातील हे जे नक्षीकाम आहे
त्याचा प्रवास गुरुमुखातून शिष्याकडे होतो.आणि या प्रकारेच ते आत्तापर्यंत टिकले आहे.अशा ह्या गुरुकुल
पद्धतीमध्ये मला शिकायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. खरोखरच अभिषेकिंसारखे गुरु मिळणे हे
महदभाग्यं ! मुळातच सढळ हाताने देणारे गुरु कमी आहेत,आता तर नाहीतच. कारण तो काळ गेला. कारण आता
जीवन पद्धती अशी झाली आहे की त्यात गुरुकुल पद्धती बसणे शक्य नाही.मी अभिषेकींचा शेवटचा शिष्य होतो.
त्यानंतर त्यांनी आणखी शिष्य घेतले नाहीत. त्या पद्धतीत मला शिकायला मिळाले हा खरोखर माझे आयुष्य
बदलणारा अनुभव होता.खूप मोठा turning point होता.
एरवी माझे आयुष्य हे सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होते. अगदी साधे उदाहण सांगायचे तर — – .पुण्यात जंगली
महाराज रोडवर ‘adidas ‘ चे दुकान होते .मला तेथील बूट हवे होते .वडिलांनी सांगितले १०वीत चांगले मार्क्स
मिळाले तर घेऊन देईन.८८/८९% मार्क्स मिळाले.कोणत्याही कॉलेज मध्ये अडमिशन मिळत होती ,सर्व मित्र
फर्ग्युसन मध्ये गेले म्हणून मी ही तिथे गेलो. माझे हट्ट ,आईवडिलांची समजूत घालणे ,सर्व साधारणपणे
मध्यमवर्गीय घरांमधून जे चित्र दिसते तेच माझ्या घरीही होते.हा माझा एक वेगळा track होता. एकाबाजूला तो
चालू होता. typical teeneger चा ! तो महेश वेगळा होता. पण अभिषेकीजिंकडे जातानाचा महेश वेगळा असे.
एकदम साधा ,नम्र ,अभ्यासू ! हा माझा जो track होता तो विलक्षण होता. माझ्या गरजा फार कमी
आहेत.सर्वसाधारण साध्या गोष्टींमध्ये मला आनंद मिळतो.पुणे विद्यापीठातून इंजिनिअर झाल्या नंतर पुढील
शिक्षणासाठी मी usa ला गेलो. तिथे मला fast cars आवडायला लागल्या ,एव्हढेच काय ते नाहीतर बाकी अगदी
छोट्या गोष्टींमधून सुद्धा मी आनंद घेऊ शकतो. I had two different zones.
घर आणि गुरुकुलाच्या आठवणीत रममाण झालेल्या महेशला मी म्हटले म्हणजे जणु दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर
दोन वेगळे महेश रहात होते तर ! त्यावर महेश म्हणाला हो आणि अशा प्रकारच्या दोन वेगवेगळ्या tracks मुळे
थोडीशी ओढाताण व्हायची .
मी us ला गेलो ,आपल्या देशाबाहेर पडलो,independance वाढला ,आत्मविश्वास वाढला, माझे विचारांचे क्षितीज
रुंदावले ,अनेक दालने माझ्यासमोर खुली झाली,आणि जगाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला.ज्याप्रमाणे
३००००फुटांवर तुम्ही गेलात तर जग तुम्हाला वेगळे दिसते,त्याप्रमाणे देशा बाहेर पडल्यावर,अमेरिकेत गेल्यावर
तेथून मला भारतीय संस्कृती वेगळी दिसली.आणि इथेच माझ्या विचाराना वेगळी दिशा मिळाली. भारतीय
असलेल्या उणीवा लक्षात आल्या,त्याचबरोबर त्या उणीवा काढून आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत
पोचवायला पाहिजे, शास्त्रीय संगीताचा कुंठीत झालेला प्रवाह वाहता ठेवण्यासाठी तरुण पिढीशी नाते जोडायला
पाहिजे ,रुढींचे ओझे नम्रपणे झुगारून द्यायला हवे ,काळाप्रमाणे बदलायला पाहिजे, हे लक्षात आले आणि इथे
माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले , मी माझी वाटचाल बदलली !आणि हा turning point पुढच्या
वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरला.
what is being cultural and what is not being cultural ह्याविषयी मनात प्रश्न निर्माण झाले. जसे
पारंपारिक गायकाचा पेहेराव न घालता,जीन्स व टी शर्ट घालून गायला बसलो म्हणजे मी serious गायक नव्हे
असा अर्थ होत नाही. गायला बसल्यावर जर स्वर चांगले लागले तर काय फरक पडतो जीन्स घातल्याने ?आणि
म्हणुनच रुढींचे हे
ओझे आपण टाकून द्यायला हवे हे समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी मी एकदा T V वरती माझा कट्टा मध्ये
मुलाखती साठी मुद्दाम टी शर्टआणि जीन्स घालून गेलो.आपल्या मनावर आपण जे हे रुढींचे ओझे वाहतो ते
टाकायला हवे,हे कृतीतून दाखवले. मी कदाचित अमेरिकेत गेल्यामुळे शिकलो की पेहेरावाला महत्त्व द्यायची
आवश्यकता नाही.
आता आपण golden age मध्ये आहोत. भारतीय संस्कृती आता फार पुढे गेली आहे.संस्कृती जेव्हा अशी पुढे पुढे
जाते,तिची प्रगती होत जाते ,तेव्हा त्यात pretence ढोंगीपणा किंवा hypocrite दांभिकपणा येण्याची शक्यता
असते उदा –अमेरिकेत गेल्यानंतर एकदा एका योगा स्टुडीओत जाण्याचा योग आला.तिथे स्थायिक झालेले
भारतीय लोक म्हणत होते वा वा आमचे योगा तिथपर्यंत पोहोचले,योगा कसे उपयुक्त आहेत,आम्ही योगा करतो
इ इ.! त्यातील १० लोकं निवडली आणि त्यांना विचारले की सूर्यनमस्कार घालताना श्वास कधी आत घ्यायचा
कधी बाहेर सोडायचा — -तर त्यातील फारतर एकदोन जणांना नीट माहीत होते. एकला घ्या दोनला ठेवा तीनला
सोडा. हे उत्तर मला माहीत होते. कारण लहानपणी १०८ सूर्यनमस्कार घालण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतला होता.
तसेच आमची संस्कृती खूप प्रगत आहे,आमचे संगीत खूप छानआहे असा जो pritence हळूहळू यायला लागतो तो
माझ्यात सुदैवाने आला नाही. कारण मी इतका लहान होतो आणि घेऊन गेलेले संगीत १५/२० वर्षे जुने होते. त्याला
ज्या पद्धतीने खोलवर अभ्यास करून नेले होते त्या पद्धतीने जवळ ठेवून त्याला फुलवण्याचा प्रयत्न करत
होतो.रुढी आणि संस्कृती ह्यात फरक आहे.ह्या दोन्ही एक नाहीत.व्यक्तीच्या किंवा समाजाच्या विकासासाठी ज्या
रुढी,रीती जाचक आहेत त्यांचा त्याग करून संस्कृती जपली गेली पाहिजे हा डोळस विचार परदेशात गेल्यामुळे
माझ्या मनाला पटला आणि त्यांना challange करायचे,आव्हान द्यायची आवश्यकता वाटली आणि मला वाटते
ते बळ मला देशाबाहेर राहिल्यामुळे मिळाले असावे.
एकदा us मध्ये PANIIT मध्ये honarary tradition impressing change या विषयावर discussion होते. तिथे
बोलताना मी म्हटले ‘ honarary tradition sometimes means questioning it and making sure that you
are not following norms but actually esthetic value of the tradition.
माझ्या व्यक्तिमत्त्वाचे दोन कप्पे आहेत. Mahesh the person आणि Mahesh the music student.ह्या
माझ्या प्रवासात हे दोन्ही कप्पे मोकळे झाले आणि त्यांचा एकमेकांशी संवाद सुरु झाला. त्यामुळे माझ्या
स्वभावातील चांगल्या गुणांचा प्रभाव माझ्या गाण्यावर पडला आणि गाण्याचा जो stance होता,तो माझ्या
स्वभावावर पडला. गाण्यावर जो मनापासून भक्ती करतो,तो गाण्यापुढे नतमस्तक होतो,झुकतो आणि माझ्या
आयुष्यात ते व्हायला लागले. मी त्यामुळे नतमस्तक झालो.
गायनाच्या विश्वात रममाण झालेल्या महेशला जागे करत मी म्हटले म्हणजे परमेश्वर आणि भक्त यांचे जे नाते
आहे तसे नाते गाण्यात आणि तुझ्यात निर्माण झालेआहे.
महेश म्हणाला अगदी खरे आहे आणि ह्यातूनच song of the divine हा कार्यक्रम मला सुचला . मी भारतात
असतो तर हे सुचले नसते व मी केले नसते .
भारतात गल्लोगल्ली मंदिरे आहेत आणि तिथे नेहमी कीर्तने होत असतात.पूर्वी या कीर्तनातून भक्ती कशी
करावी,गुरुमहात्म्य म्हणजे काय अशा प्रकारचे प्रबोधन व्हायचे व त्यातून स्फूर्ती घेऊन लोकं वारीला जायची.
आजकाल कीर्तनाला १५/२० फारतर ३०/४० माणसे जातात. त्यातही घरात अडगळ वाटणारी म्हातारी माणसे
उपस्थित असतात.म्हणजे ज्या पिढीकडे हे प्रबोधन पोचायला पाहिजे ती पिढी कीर्तनाला जातच नाही.आजकाल
प्रबोधन तर होत नाही आणि वारीला जाणाऱ्यांची संख्या आहे ३/४ लाख ! मग प्रश्न पडतो की हे काय social
tourism आहे का ? भक्ती रसात तल्लीन होऊन जाण्याऐवजी फैशन म्हणून ,गंमत म्हणून ,चल वारीला जाऊन
लोकं पण भेटतील या विचाराने जातात का ? मुळात हा उद्देशच चुकीचा आहे. म्हणजे इथे विठ्ठलाची भक्ती हा
उद्देशच नाही ! मी असे म्हणत नाही की वारीमध्ये वाईट गोष्टी होतात.असे काहीही होत नाही. पण शक्यता
नाकारता येत नाही .आज वारीची जी पद्धत आहे त्यात बरीच काही सुधारणा होऊ शकते,आणि ईश्वराची भक्ती
हा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने सार्थ होऊ शकतो.
मग माझ्या मनात विचार आला की कीर्तनात हा उद्देश आपल्याला कसा आणता येईल ? या विचारातून song
of the divine ची कल्पना सुचली.
Song of the Divine हा कार्यक्रम मला भव्यदिव्य करायचा होता. यासाठी आम्ही अमेरिकेतील Stanford
विद्यापीठाचा चा भव्य हॉल घेतला .एका weekend ला तिथे कीर्तन symposium होते. आणि आमचे song of
divine हे त्याचे प्रमुख सूत्र होते. Anna Schultz नावाची music professor आहे तिने सर्व व्यवस्था केली. ६०/७०
बाहेरचे scholars आणि बाकी सर्व campus वरचे. ७००/८०० माणसे जमली .मी सर्व script लोकांना समजावे
म्हणून इंग्रजी भाषेत लिहिले.पूर्वरंग झाल्यावर बुक्का लावतात,प्रथम बुवा आणि नंतर तबला पेटी व मग सर्व
भक्तगण ! मी म्हटले आपण सर्वाना बुक्का लावू त्यावर Anna म्हणाली हे असे religious लोकांना रुचेल की
नाही सांगता येत नाही.मी म्हटले माझे सहकारी सर्वाना बुक्का लावू का विचारतील. ज्यांना हवे ते लावतील. पण
अक्षरशः सर्व लोकांनी मागून मागून कपाळी बुक्का लावला आणि टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलरखुमाईच्या
अभंगात तल्लीन होऊन सर्वजण नाचू लागले, गाऊ लागले.जात धर्म राष्ट्र या सर्व बंधनांच्या पलीकडे जाऊन
विठ्ठलाचे भक्त होऊन स्वतःला विसरून विठ्ठलाशी एकरुप झाले.
एका यशस्वी गोष्टी बरोबर चार चांगल्या गोष्टी होत असतात. कीर्तन हा माझा धंदा नाही पण आज ७००
लोकातील ७० लोकं जरी इंडियात गेली व म्हणाली चल आपण त्या कीर्तनाला जाऊन बसू या तरी माझे कार्य
यशस्वी होईल. माझ्या सारखे आणखी पण कोणी प्रयोग केले तर ७० चे ७०० होतील ,७०० चे ७००० होतील !
म्हणजेच हळूहळू हे परिवर्तन होत राहील, प्रवाह वाहता राहील.
Song of the divine चे हे वर्णन ऐकून मी पटकन म्हटले ,महेश जणू पंढरपूर देहू आळंदी ही सर्व तीर्थस्थळे
सातासमुद्रापार अमेरिकेच्या मातीत तू उभी केलीस !
त्यावर महेश पटकन म्हणाला एका आजींनी विठ्ठल म्हणून मला नमस्कारच केला ! फिलाडेल्फियाला कीर्तनाचा
कार्यक्रम होता.कीर्तन संपल्यावर प्रेक्षकातून एक आजी आल्या आणि त्यांनी मला नमस्कारच घातला.साहजिकच
मी त्यांना म्हटले अहो आजी हे काय करताय?आजी म्हणाल्या गेली काही वर्षे मी इथे मुलाकडे राहात आहे.पुण्यात
असताना मी नेहमी वारीला जात होते.आज वारी नाही पण तुझ्या रुपात मला प्रत्यक्ष विठ्ठलाची भेट झाली,त्यांनी
मला दर्शन दिले. तुझे ऋण मी विसरू शकत नाही.आजींच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद पहिला आणि कीर्तन केल्याचे
एक आंतरिक समाधान मिळाले !
त्यानंतरचा टप्पा म्हणजे ८ डिसेंबर २०११ रोजी पुण्यामध्ये सवाई गंधर्व मध्ये मला गाण्याची संधी मिळाली.या
turning point ने समाजात माझ्या गायनाला मानाचे स्थान दिले .पुण्यामध्ये संपन्न होणारा सवाई गंधर्व संगीत
महोत्सव भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात मानाचा आणि अतिशय सुप्रसिद्ध असा महोत्सव मानला जातो
.याची सुरवात भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांनी केली आणि आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी हा
महोत्सव आयोजित केला जातो.जसे यशराज थिएटर मध्ये काम केल्यानंतर तुम्ही top class hero होता,तसे
शास्त्रीय संगीताच्या विश्वात सवाई गंधर्वात तुम्ही हजेरी लावलीत म्हणजे A दर्जाचे गायक होता !
माझ्या दृष्टीने हा turning point खूप महत्त्वाचा होता. कारण त्यामुळे माझ्यात independanceआला. एकदा मी
कव्वाली गात होतो ,माझ्या पाठी ८/१० लोकं ठेक्यावर टाळ्या वाजवत होती.एका गृहस्थाने येऊन विचारले का हो
तुम्ही अल्ला अल्ला करता, मुसलमानांची गाणी म्हणता ?आपल्याकडे काय आपली गाणी नाहीत का ? मी त्यांना
सांगितले मी कव्वाली पण गातो आणि निर्गुणी भजन पण गातो.पण ही कव्वाली गाण्याचा विचार आणि
गृहस्थाना उत्तर देण्याचे धारिष्ट्य माझ्या मध्ये मी देशाबाहेर पडल्यामुळेच कदाचित आले असावे.
सर्वसाधारणपणे असा समज आहे की एकदा सवाईत गायले की शास्त्रीय संगीतकाराप्रमाणे गायचे,पण मला असे
वाटते की मला सवाईमुळे गाणे कोणत्या पद्धतीने गायचे याचे स्वातंत्र्य मिळाले. शास्त्रीय संगीत गाताना मी
कोणतीही प्रतारणा करत नाही ,एकही स्वर इकडे तिकडे होत नाही.That art deserves for this kind of respect
! देवघरात जायचं की नाही ते आपण ठरवायचे ,पण जायचं ठरवलंच तर चपला काढायच्याच !सवाई मुळे मला जे
स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे मी पगडी घालून कीर्तन पण करू शकतो व मिलांज सारखे कार्यक्रम पण !
ह्यानंतर मी पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनावर एक कार्यक्रम केला. My father Pandit Bhimsen !त्यांचा
मुलगा usa ला आला होता. त्याने काही clips पाठवल्या. त्यावरून मी कथानक लिहिले. ३० मिनिटे clips ,नंतर
त्यांचा मुलगा बोलला,आणि नंतर ३० मिनिटे story असा कार्यक्रम होता.तो खूप रंगला.त्याचवेळी तिथे सुप्रसिद्ध
अभिनेत्री अश्विनी भावे आल्या होत्या.आणि आम्ही एकत्र कार्यक्रम करायचे ठरवले.
आपली परंपरा एव्हढी विशाल आहे की त्याचे एक अंग जरी दाखवले तरी तिच्या विशालतेचा अंदाज येतो. झाकीर
हुसेन एव्हढे मोठे पण त्यांचा तबला म्हणजे संपूर्ण शास्त्रीय संगीत नव्हे — -तो तर त्याचा एक छोटासा भाग आहे.
तसेच रविशंकरजींची सतार म्हणजे संपूर्ण शास्त्रीय संगीत नव्हे — -तो एक छोटासा अंश आहे. सरोद म्हणजे सर्व
शास्त्रीय संगीत नव्हे.आपल्या संगीताचा आवाका एव्हढा मोठा आहे म्हणुनच गायनाच्या सर्व प्रकारांचे दर्शन व्हावे
या हेतूने तो design मधून सांगावा असे वाटले,आणि या विचारातून मिलांजचा जन्म झाला .
‘मिलांज ‘ ह्या कार्यक्रमाची सुरवात साम्य वेदातील जाती गायनाने होते.नंतर ध्रुपदाचा उल्लेख होतो.मग ख्याल
ठुमरी दादरा टप्पा तराणा नाट्यगीत निर्गुणी भजन गझल कव्वाली अभंग भैरवी अशा वेगवेगळ्या प्रकारांच्या
प्रवासातून नंतर मैत्रीमध्ये केलेल्या गप्पा म्हणजे मिलांज ! उदा –सर्वाना माहित आहे तानसेन मोठा
गाणारा,त्याने पाऊस पाडला,दिवे लावले एव्हढेच ! पण तानसेन धृपद नावाचा प्रकार गायचा हे कोणालाच माहित
नाही त्यामुळे या गप्पातून श्रोत्यांना गायकाची अशी नवीन ओळख पण करून द्यायची .
आजच्या तरुणांची विचार करण्याची ,गप्पा मारायची पद्धत निराळी आहे.तो आपला रॉक स्टार तानसेन काय
धृपद गायचा ! अशा पद्धतीने आजचे तरुण विचार करतात. आपल्या आजच्या जीवन शैलीमध्ये बघितले तर
कॉर्पोरेट बँकेत सलाम सर असे पूर्वी म्हणत आता पहिल्या नावाने हाक मारतात. पूर्वी आल्या आल्या वडिलधाऱ्या
लोकांच्या पाया पडायचे ,संध्याकाळी घरी आल्यावर पायावर पाणी घेऊन शुभंकरोती म्हणायचे ,मी हे करायचो
आताची पिढी हे करत नाही. ह्याचा अर्थ असा नव्हे त्यांना respect नाही. आदर दाखवण्याचा त्यांचा मार्ग वेगळा
आहे.पद्धत बदलली आहे आणि ह्या बदलाचे पडसाद आयुष्यातील लहानमोठ्या सर्व गोष्टींवर उमटतात. आणि
म्हणुनच मला माझ्या तरुण मित्रांना त्यांच्या पद्धतीने सांगायचे होते what indian classical music is ! आणि
अशा प्रकारे मीलांज हा अक्षरशः दंगा कार्यक्रम होतो.
पुण्यात गणेश कला क्रीडा नावाचे एक केंद्र आहे.तेथे बाबासाहेब पुरंदरे यांच्या मुलाने माझा हा कार्यक्रम ठेवला.तिथे
नृत्यस्पर्धा होती,बक्षिस वितरण समारंभ बाबासाहेबांच्या हस्ते होता.आणि त्यानंतर माझा कार्यक्रम होता. कार्यक्रम
संपल्यावर माझ्या sound वाल्याने येऊन मला सांगितले की कव्वाली झाल्यावर छोटी मुले आली व विचारू
लागली की आम्ही नाचू शकतो का हो काका ? आणि हेच माझ्या कार्यक्रमाचे यश होते. कारण शास्त्रीय संगीताच्या
मैफिलीत नाचण्याचा विचार पण करु शकत नाही. आणि म्हणुनच इथे रस्ता बदलला गेला. नवीन मार्ग
दृष्टीक्षेपात आला .
असे नाही मी नुसते प्रबोधन करतो ,माझी प्रबोधन करण्याची अजिबात इच्छा नाही ,माझी इच्छा आहे त्याची
प्रचीती देणे आणि आत्मप्रचीती आली की माणूस त्याचा जाऊन शोध घेतो .भूक लागली की माणूस खाद्य शोधतो.
जेवायचे असते असे शिकवायचे नसते तर भूक लागली की खाणे कसे शोधायचे ते शिकवायचे असते.आणि हे सर्व
मी मिलांज मधून केले.जर मी अमेरिकेत नसतो तर हे केले नसते.आणि म्हणुनच मिलांज हा कार्यक्रम तरुणांच्या
मनाचा वेध घेण्याच्या दृष्टीने turning point ठरला.
त्याच्यापुढचा टप्पा म्हणजे कट्यार ज्यावेळी माझ्याकडे आले — — -एकतर गुरुजींचे संगीत माझ्या रक्तात आहे
आणि दुसरे म्हणजे कट्यार मुळे मला equal platform मिळाला.मी अमेरिकेत म्हणजे भारतापासून खूप लांब
राहत होतो. भारतातून जेव्हा कलाकार येतात तेव्हा ते पूर्ण संच घेऊन तिथे येतात .ते सर्व व्यावसायिक असतात
.मी जेव्हा अमेरिकेत गाणे गातो,तेव्हा एका कार्यक्रमासाठी एव्हढा संच आणणे शक्य नसते तिथे जे हौशी कलाकार
मिळतात त्यांना घेऊन काम करावे लागते,व कायम त्यांच्याबरोबर एक level वरती म्हणजेच त्यांना सांभाळून
घेऊन ती बैठक पुढे नेण्यासाठी बरेच झगडावे लागते. पण कट्यार मुळे एक equal platform मला मिळणार
होता.तोलामोलाच्या कसलेल्या वादक कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती.आणि हा माझ्यासाठी
व्यावसायिक दृष्ट्या फार मोठा turning point होता.
आणि म्हणूनच सर्व परिस्थितीशी जमवून घेऊन मी नाटक करायचे ठरवले. कारण माझ्यात ते pretention
कोठेतरी होते.मी शास्त्रीय संगीतकार आहे ,मी कसे नाटकात काम करायचे ? मला वाटते आपण हे स्वतःच स्वतः
भोवती एक रुढींचे कुंपण तयार करून घेतो,आणि मला हे कुंपण तोडून बाहेर यायचे होते ! मी भारतीय आहे
इटालियन कसे खाऊ हे म्हणणे जसे हास्यास्पद आहे.,तसेच हे आहे. काय फरक पडतो खाल्ले तर ? तुम्ही जर
भारतीय स्वयंपाक केलात,आणि त्यात गोबी मनच्युरियन केलेत तर ते विचित्र दिसेल पण एखाद दिवस खायला
काहीच हरकत नाही ! तर कट्यारमुळे अशा प्रकारचा ‘ burdon free ‘ विचार करायला मी शिकलो ! जाचक रुढींचे
ओझे झुगारून द्यायला शिकलो .
कट्यार काळजात घुसली हा सिनेमा म्हणजे माझे जीवन बदलून टाकणारा आणखी एक महत्त्वाचा turning point
म्हणावा लागेल.कारण कट्यार मुळे माझे तरुणाईशी नाते जोडले गेले, त्यांच्या मनात प्रवेश करता आला. या
सिनेमामुळे एक गमतीशीर गोष्ट घडली. आतापर्यंत चित्रपटातील गायकांना महत्त्व दिले जायचे नाही.लता दीदी
आशाताई वगैरे सोडा, कारण ती फार मोठी माणसे आहेत आणि तो era वेगळा होता. आज लोकं ते चित्रपट विसरले
पण त्यांची गाणी अजरामर झाली. पण आता बऱ्याच कालावधीनंतर कट्यार या चित्रपटात गाणे ‘ हीरो ‘ आहे.
चित्रपटाचे कथानकच तसे आहे. आम्ही सहकलाकार आहोत.कथेचा गाभा गाण्यात आहे,जीव गाण्यात आहे आणि
गाण्याच्या रुपातच हा चित्रपट यशाचे उच्च शिखर गाठणार आहे.अशी गाणी मला गायला मिळाली. त्यामुळे लोकं
आम्हाला शोधायला लागली.मग त्याचे प्रमोशन– –चला हवा येऊ द्या– –गावोगावी आम्हाला ओळख मिळाली
,interviews झाले,माझा कट्टावर झाले, निखिल वागळेनी घेतला,वाळवेकरानी घेतला,ह्यांनी घेतला त्यांनी
घेतला,आम्ही प्रसिद्धीच्या झोतात आलो.आम्हाला एक ‘ चेहेरा ‘ मिळाला.
मी मधेच म्हटले ,कट्यार काळजात घुसली या चित्रपटात गायलेल्या गाण्यांमुळे तुम्ही ‘ unseen hero ‘ झालात
त्यावर महेश म्हणाला एव्हढेच नव्हे तर यानिमित्ताने आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. जी गाणी माझ्या
आजोबांच्या वयाची आहेत ती गाणी आज तीन वर्षांची मुले गातात. कालसुद्धा छोटी मुले मला प्रेक्षकातून दाद देत
होती.मी त्या वयात असतो तर आईच्या मांडीवर डोके ठेवून शांतपणे झोपून गेलो असतो.पण ह्यांना त्याचं अप्रूप
आहे.तीन वर्षाच्या मुलाशी आजचं संगीत सुसंवाद साधू शकतं ! नातवंडांचे व आजोबांचे वेगळे
नातेअसते.वडिलांपेक्षा तो एक वेगळा bond असतो. काही गोष्टी आजीनी करायच्या असतात त्या आजीनीच !
कट्यारचे संगीत आजच्या काळात हे वेगळे नाते जोडत आहे आणि त्याची रेशीम गाठ घट्ट करत आहे !
आत्ता नुकतेच एका नाशिकच्या दुकानाचे opening होते. लहान मुले आम्हाला बघायला अक्षरशः तुटून पडली
होती.रस्ते block केले होते.आम्हाला बाहेर पडायला जागा नव्हती.आज आता बोरिवलीत कार्यक्रम आहे. मुले
तिकिटाचे फोटो काढून पाठवतात ,कैवल्याच्या चांदण्याला गाणे म्हणाल का ? ,बागेश्री रागातील तू रचलेले
लक्षणगीत गाशील का महेश असे प्रश्न पाठवतात.
त्यांची ह्या कलेविषयीची आस्था बघून, तरुणांचा हा उत्साह् बघून ,हे वेडं होणे बघुन मला वाटते आता ही उलटी
गंगा वाहते आहे — –त्याची सुरवात होते एका बिंदुपासून ! तो बिंदू लक्षवेधी असावा लागतो. तो ripple effect
प्रमाणे parcolate होतो. पाण्यामध्ये तुम्ही एखादा दगड टाकलात ,तर त्याच्यावर तरंग उमटतात.आणि हे तरंग
पाण्यात पसरतात आणि खोल खोल जमिनीत जाऊन शोषले जातात .आत्ता तिथे केंद्रबिंदू मी आहे, केंद्रबिंदू राहुल
आहे आमचे स्वर हळूहळू या तरुण पिढीच्या मनाचा तळ गाठत आहेत. तिथे रुजत आहेत, तिथे फुलत आहेत !
बोलताना त्याचा स्वर भारावला होता. त्याच्या हातावर हलकेच थोपटत मी त्याला म्हटले ,आम्हाला अभिमान
वाटतो की ,आज भारतीय संगीताच्या स्वर गंगेचा प्रवाह भारताच्या मातीतून झिरपत जगभर पसरत आहे आणि
भारतीय परंपरेचे तरंग जगातील तरुणाईच्या मनावर उमटत आहेत यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या महेशचे
योगदान मोठेआहे.
तेव्हढ्याच नम्रतेने तो पुढे बोलू लागला ,आज आमच्या गाण्याला तोबा गर्दी होते ,लोकं hot cake सारखी तुटून
पडतात.धक्काबुक्की ,सेल्फी,सर्व youngsters असतात ,हॉलवाले कंटाळून दिवे मालवतात.अचानक रॉकस्टार
झाल्यासारखे वाटते. सुदैवाने आध्यात्त्मिक विचारांची बैठक आहे म्हणून नाहीतर हे अमाप यश डोक्यात शिरायचे !
मला माहीत आहे महेश म्हणून ते येत नाहीत तर भारतीय संगीताचा एक प्रतिनिधी गात आहे म्हणून ते
येतात.आज जी गाणी आम्ही कार्यक्रमात एकत्र गातो ना ती गाणी उद्या दुसऱ्या कोणी गायली तरी त्या लोकांच्या
गाण्यालाही तोबा गर्दी होईल.आज नाट्यसंगीतावर कट्यार बेतले आहे,आणि आम्हाला महेश काळे खूप आवडतो
ह्यावरून असे रुपांतर व्हायला हवाय की नाट्यगीत का तर हो. आमच्या गावात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आहे मी
जाऊन बसतो,हे व्हायला हवाय !आणि हे हळूहळू होत आहे.आणि हेच आमचे यश आहे.
अमेरिकेत मिलांजच्या कार्यक्रमाच्या वेळी एक मुलगी आली होती . तिची आई अमेरिकन होती आणि वडील पंजाबी
होते. कार्यक्रमानंतर तिचा मेल आला. महेशजी तुम्ही जे निर्गुणी भजन गायलेत तेच मि कुमार गंधर्व यांनी पण
गायले आहे.here is a link ! माझ्या गाण्याला किती टाळ्या मिळतात हे माझे यश नाही,तर एक अमेरिकन born
मुलगी भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल खोल विचार करते हे माझे यश आहे.अर्थातच मी आभारी आहे ,माझा
कार्यक्रम आवडल्या बद्दल ! पण मी यश मोजतो ते, हा भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रवाह आता वाहायला सुरवात
होत आहे या गोष्टीत ! जोपर्यंत वाहती नदी आहे तोपर्यंत त्याला खराब वास येत नाही,पण प्रवाह कुंठीत झाला तर
शेवाळे जमते ! फार काळानंतर हा प्रवाह आता पुन्हा सुरु होत आहे,आणि हेच माझे यश आहे आणि तो प्रवाह
वाहता ठेवणे हे माझे स्वप्न आहे .
आज हिंदी बंगाली भाषेत कट्यार सिनेमा काढायचा आहे , कमल हसन यांना या चित्रपटावर काम करायचे आहे
,पंडित जसराजजी यांचे आशीर्वाद मिळाले ,राजनसाजन मिश्रा भेटले व म्हणाले ,कल सिनेमा देखा और आपके
स्वरोने हमे मंत्रमुग्ध किया है ,साक्षात गंधर्व आपके गलेमे है ! शंकराभरणंचे के विश्वनाथ यांना सत्कार करायचा
अशाप्रकारे एका बाजूला लोकांचे हे प्रेम आणि दुसऱ्या बाजूला national award मिळाल्याने मिळालेला राजाश्रय !
त्यामुळे ही eco system आता अशी बसली आहे की Its like a snowball — — -वाढत चाललाय — –वाढत
चाललाय ! शास्त्रीय संगीताचा हा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी मला ‘youth center ‘ सुरु करायचे आहे,आणि ते
माझे स्वप्न आहे. usa मध्ये BMM बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन असते . भारतातील अनेक नामवंत
सुप्रसिद्ध व्यक्तींना बोलावतात .पण तो pan त्या काळात भारतात राहिलेल्या परंतु आता अमेरिकेत स्थायिक
झालेल्या लोकांसाठी असतो.आताच्या तरुण पिढीसाठी ही सर्व लोकं अपरिचित आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे
योगदान माहीत नसल्याने ते त्यांच्याशी नाते जुळवू शकत नाहीत. जसे उदा माझ्या लहानपणी मायकेल
जाक्सान हा आम्हाला माहीत पण नव्हता काळा की गोरा आहे,पण केबल आली अनेक वाहिन्या आल्या आणि
त्याची ओळख झाली. तसेच आज आपली ही मंडळी कितीही थोर असली तरी या पिढीला ती अनभिज्ञ
आहेत,म्हणून त्यांची ओळख करून द्यायची आहे ,त्यांच्यात आणि या तरुणाईत नाते निर्माण करायचे आहे,
प्रचीतीतून त्यांची मने एकमेकांशी जोडायची आहेत.आजचा जमाना हा बुवाबाजीचा नाही,आजची पिढी खूप हुशार
आहे.त्यांना अनुभवातून प्रचीती द्यायची आहे. मग ते आपोआप येऊ लागतील म्हणतील yes I love this ! I
want to learn this !
जगातील सर्व लोकांसाठी मला गायचे आहे. माझा पिंड गायकाचाच आहे. गायला लागल्यावर मी सर्व जग विसरतो.
पण गाणे असते तीन तास ,दोन मैफिली केल्यातर सहा तास ! पण २४ तासात बराच वेळ बाकी असतो . म्हणून मी
तिथे २५०/३०० मुलांना गाणे शिकवतो. कारण म्हणतात ना ‘ you get the government you deserve ,तसेच
get the music you know ! त्यामुळे you have to arm people with inside,not just knowledge ! माहिती
तर काय wikipedia मध्ये पण असते . ताल म्हणजे काय राग म्हणजे काय सर्वांच्या व्याख्या मिळतात ,पण जसे
पुस्तक वाचून पोहोणे शिकता येत नाही तसेच गायनही ! ही गुरुमुखी विद्या आहे .संशोधक संशोधन करताना डोके
चालवतो ,डोके चालवतो मधेच अडकतो तेव्हा प्रोफेसर कडे जातो तेव्हा प्रो सांगतात हे असे नाही असे कर .ही जी
पद्धत आहे त्यात ह्या तरुणाईला गुंतवले तर — — ? त्यांची डोकी विलक्षण आहेत ,त्यांचा उपयोग सकारात्मक बळ
देण्यासाठी केला तर ?
महेश पुढे भरभरून बोलतच होता– — -पण त्याच्याआत्तापर्यंतच्या प्रवासातील turning points ऐकता ऐकता
माझ्या मनात आले की खरोखरंच स्वतः महेशच तरुण पिढीचा turning point आहे. तरुण पिढीला कूपमंडूक
वृत्तीतून बाहेर खेचणारा पण त्याचबरोबर परदेशातही भारतीय कला आणि संस्कृती जतन करायला शिकवणारा
turning point ! हा point शिकवत आहे देशाच्या वेशीतून बाहेर पडा. सभोवतालचे क्षितीज खूप मोठे दिसेल
तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल ,आणि तुमचे वैचारिक मानसिक बळ वाढेल . तेथून जर आपली भारतीय
संस्कृती पहिलीत तर ती वेगळी दिसेल. रुढींचा गुंता सोडवण्याची क्षमता तुमच्यात येईल. ‘ महेश ‘ हा turning
point च तरुणाईच्या द्वारे भारतीय संगीताच्या प्रवाहाला निर्मळ झऱ्याप्रमाणे खळखळ वहायला शिकवेल,
देशाच्या बाहेर राहूनही भारतीय संस्कृतीशी,मातृभूमीशी असलेली रेशीम गाठ दृढ ठेवून,भारतीय परंपरेच्या शाखा
जगभर पसरवेल !
अशा ह्या महेश नामक ‘ turning point ‘ ला काय नाव द्यायचे , कोणती पदवी द्यायची ? सवाई गंधर्व , कुमार
गंधर्व , बाल गंधर्व — — -की नव गंधर्व ? महेशच्या कार्याची , विचारांची घोडदौड पाहिली की असे वाटते ,भविष्यात
लवकरच “– — — गंधर्व “ अशी उपाधी त्याच्यासाठी शोधावी लागणार !
३मे २०१६ रोजी महेशला “National Award “ मिळाले !त्यनिमित्त त्याला लक्ष लक्ष शुभेच्छा !
मेघना अशोक वर्तक
